मुंबई : गोरेगाव येथील वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथक पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गेले होते. ते मुंबईत परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांचा चिमूरडा देखील मृत्युमुखी पडल्याने गोरेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ढोल वाजवायला गेलेल्या आठ वर्षीय वीर मांडवकर याचा व्हिडिओ वायरल होत आहे.
दरीत बस कोसळली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराशेजारी असलेल्या खोल दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे 4 वाजता झालेल्या या भीषण अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटोपून मुंबईत येत असताना हा अपघात झाला. मुंबई पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील तरुण-तरुणी या खाजगी बसमधून प्रवास करत होते. यात आठ वर्षाच्या वीर मांडवकरवर शनिवारी पहाटे काळाने घाला घातला.
परफॉर्मन्स शेवटचा ठरला :आवड म्हणून ढोल वाजवणाऱ्या वीरचा पुण्यातील कार्यक्रमातील हा परफॉर्मन्स शेवटचा ठरला आहे. ढोल वाजवण्यासाठी पुण्याला गेलेल्या वीर आता कधीच घरी परतणार नाही. वीरच्या मृतदेहावर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. वीर मांडवकर हा गोरेगाव येथील संतोष नगरमध्ये आपल्या आईसोबत राहत होता. काही कौटुंबिक कारणामुळे वीरचे वडील वेगळे राहत होते.