मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. मुंबई पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी दिली. सुलोचना लाटकर यांचे रविवारी निधन झाले होते. त्या ९४ वर्षांच्या होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुलोचना यांना गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्याचे उपचार सुरू होते. याच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन: सुलोचना दीदी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी सुलोचना दीदी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीदींच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर देखील उपस्थित होते.
चित्रपट सृष्टीतील कामगिरी:सुलोचना दीदींना चित्रपट सृष्टीची आई म्हटले जाते. त्यांनी पडद्यावर साकारलेली आई अनेकांच्या आजही डोळ्यासमोर तरळते त्यामुळेच त्यांना आदराने दीदी अशी हाक मारत. सुलोचना दिदींचा जन्म 30 जुलै 1928 रोजी झाला. 1942 मध्ये लग्न झाले. त्यावेळी त्यांचे केवळ वय 14 वर्षे होते. दीदी कोल्हापुरात होत्या आणि तिथे प्रसिद्ध जयप्रभा स्टुडिओ होता. हा स्टुडिओ मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठे नाव भालजी पेंढारकर यांच्या मालकीचा होता. त्यांच्या सहवासात सुलोचना यांनी अभिनयाची कला आत्मसात केली. मासिक पगारावर त्या इथे काम करत होत्या.