मुंबई: चित्रपट क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे.प्रसिद्ध अभिनेत्री बेला बोस तसेच शास्त्रीय नृत्यंगणा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. २० फेब्रुवारी २०२३ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी 1959 च्या 'मैं नशे में हूं' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्रसिध्द अभिनेते तथा निर्माते आशिष कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले होते. ज्येष्ठ अभिनेत्री बेला बोस यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
बेला बोस यांची कारकीर्द:कलकत्त्याहून मुंबईत आलेल्या बेला बोस यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. शास्त्रीय मणिपुरी नृत्य प्रकारात प्रशिक्षण घेतलेल्या त्यांनी सुरुवातीला बॅक ग्राउंड डान्सर म्हणून काम केले आणि त्यांचे नृत्य आणि पदलालित्य अनेकांच्या नजरेत भरले. राज कपूर यांच्या ‘मैं नशेमें हूं’ मध्ये बेला बोस ला प्रमुख नर्तिका म्हणून संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचे सोने केले आणि त्यांचा चित्रपटातील अभिनय प्रवास सुरु झाला. खरंतर त्यांनी कलकत्ता येथे बंगाली नाटकांतून कामे केली होती. नंतर बेला बोस यांना 'सौतेला भाई'मध्ये गुरु दत्त बरोबर नायिकेची भूमिका मिळाली. बोस यांनी 200 हून अधिक हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
या चित्रपटांतून साकारल्या भूमिका: बेला बोस यांना नंतर खलनायकी भूमिका मिळू लागल्या. त्या भूमिका गाजल्या आणि त्यांना नंतर व्हॅम्पच्या भूमिकांसाठी घेतले जाऊ लागले. 'शिकार', 'जीने की राह' आणि 'जय संतोषी मा' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांच्या आकर्षक आणि उत्साही नृत्यासाठी आणि प्रतिभावान अभिनयासाठी त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. बिमल रॉय यांचा बंदिनी, शम्मी कपूर सोबत प्रोफेसर, वैजयंतीमाला अभिनित आम्रपाली, उमंग, देव आनंद यांचा ये गुलिस्तान हमारा, दिल और मोहब्बत, जिंदगी और मौत, प्रेम पत्र, अनपढ, जिद्दी, पूनम की रात, नींद हमारे ख्वाब तुम्हारे, सीआयडी, फरेब सारख्या बऱ्याच चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
बेला बोस यांचे जीवन:जय संतोषी मातामध्ये कामे करताना त्यातील नायक आशिष कुमार यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि नंतर त्या दोघांनी लग्न केले. जीने की राह या जितेंद्र आणि तनुजा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातील त्यांची भूमिका बेला बोस यांच्या खूप जवळची होती. लग्नानंतर त्यांनी चित्रपटातील कामे हळू हळू कमी केली आणि संसारावर लक्ष केंद्रित केले. त्यांना एक कन्यारत्न, जी डॉक्टर आहे, असून एक मुलगा आहे. दुर्दैवाने बेला बोस यांच्या पतीचे दशकभरापूर्वी निधन झाले. आपल्या करियरच्या उंचीवर असताना बेला बोस यांनी पडद्यावर बिकिनी घालण्यास नकार दिल्यामुळे त्यांना काही चित्रपटांवर पाणी सोडावे लागले होते. परंतु त्यांना चित्रपटसृष्टीचा आणि त्यातील त्यांच्या सहभागाचा त्यांना नेहमीच अभिमान होता.
हेही वाचा:Bhagat Singh Koshyari : मला विमानातून खाली उतरवले, आता तेच सत्तेच्या खर्चीवरून खाली उतरले; कोश्यारी ठाकरेंवर बरसले