मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या इमारतीच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडी सापडली. या गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) तपास केला जात आहे. एनआयएपूर्वी एटीएसकडून काही दिवसांसाठी या संदर्भात तपास केला गेला. एटीएसच्या तपासामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
फेब्रुवारी महिन्यातील गाड्यांचा तपशील उपलब्ध नाही
ज्या वेळेस अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके मिळाली होती, त्या वेळेसच एटीएसने या स्कॉर्पिओ संदर्भात तपास सुरू केला होता. मनसुख हिरेन यांची या संदर्भात चौकशी केली असता त्यात काही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला होता. त्यानुसार, सचिन वाझेच्या खासगी ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तीन दिवस मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आणून उभी केली असल्याचे तपासात समोर आलं होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात येणाऱ्या गाड्यांचा तपशील पोलीस आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
गाड्यांची नोंद अद्यापही लेखी स्वरूपात नाही
एटीएसकडून या प्रकरणी तपास केला जात असता, स्कॉर्पिओ ही पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये गेली असल्याचे समोर आलेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलेल्या प्रत्येक गाडीच्या नोंदीची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडे मागवली होती. मात्र यासंदर्भात फेब्रुवारी महिन्याची माहिती उपलब्ध नसल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून एटीएसला केवळ तोंडी कळविण्यात आले होते. यानंतर हीच गोष्ट लेखी स्वरूपात देण्याचे एटीएसने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील संबंधित विभागाला सांगितले. मात्र, अद्यापही लेखी स्वरुपात अशा प्रकारचे कुठलेही उत्तर देण्यात आले नसल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.