मुंबई - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरवर दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत होणारी सभा आम्ही उधळणार, असा इशारा उत्तर-मध्य मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजरिया यांनी दिला.
...तर मुंबईतील मोदींची सभा उधळून टाकू, वंचित बहुजन आघाडीचा इशारा - साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर
भाजप आणि मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत २६ एप्रिलला होणारी सभा उधळणार, अशी धमकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहेमान अंजरिया यांनी दिली.
भाजप आणि मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देऊन देशासाठी वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांचा आणि देशातील कोट्यवधी जनतेचा अवमान केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत २६ एप्रिलला होणारी सभा आम्ही उधळून टाकणार आहोत. यासाठी मुंबईतून वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन सभेच्या ठिकाणी निषेध व्यक्त करतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच यासाठी आम्हाला पोलीस यंत्रणेने विरोध केला तरी आम्ही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लीमबहुल विभागात काँग्रेस आणि भाजपच्या एकाही खासदाराने आतापर्यंत विकासकामे केलेली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच मी लोकांच्या प्रश्नासाठी उभा असल्याचेही त्यांनी सांगितले. मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही तर मी या मतदारसंघातील जनतेचा उमेदवार असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.