मुंबई :शहरात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू आहे. मुंबई महापालिका आणि शिंदे सरकारकडून शंभर टक्के नालेसफाई, खड्डे मुक्त रस्ते आणि सर्वात महत्त्वाचे मुंबई शहर आणि उपनगर पावसाच्या पाण्याने तुंबणार नसल्याचा दावा केला होता. पहिल्या पावसात मुंबई शहर आणि उपनगर तुंबल्याने मुख्यमंत्री आणि महापालिकेने केलेला दावा फोल ठरला आहे. ढिल्या आणि भ्रष्ट कारभारामुळेच करदात्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रचंड वाहतूक कोंडी : अंधेरी सबवे तर जलमय झाल्याने संपूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यामुळे त्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने, मुंबईकरांचे हाल झाले. मागाठाणे येथे भूसख्खलन झाले. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याच्या, मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याच्या शेकडो तक्रारी येत आहेत. अवघ्या पाच दिवसांच्या पावसात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. रस्ते दुरुस्ती तसेच खड्डेमुक्तीसाठी या वर्षी १४४ कोटी आणि आणि नालेसफाईसाठी २५७ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा, मुंबई महानगरपालिकेकडून केला जात आहे. पहिल्या दुसऱ्या पावसाने मुंबईकरांचे अत्यंत हाल झाले, मग मुंबई महानगरपालिकेने खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे ? हे पैसे त्यांनी कुणाच्या घशात घातले, यामध्ये घोटाळा आणि भ्रष्टाचार झाला आहे, त्याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.