महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Varsha Gaikwad : भाई जगतापांची उचलबांगडी, वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती

आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. मुंबई काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी पत्र काढून वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

By

Published : Jun 9, 2023, 10:15 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - मुंबई काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेस वरिष्ठांकडून निर्णय घेतल्याचे परिपत्रक काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी पत्रक काढून वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आहे.

भाई जगतापांची उचलबांगडी -येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेत काँग्रेसला बहुमत मिळावण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबवण्यात यश येणार आहे. त्यासोबत दलित आणि अल्पसंख्याक समाजात एक वेगळा संदेश देखील जाणार आहे. आमदार भाई जगताप यांनी आपले मुंबई शहर अध्यक्षपद वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले असल्याचे समजते. दोन महिन्यापूर्वी मुंबई काँग्रेसकडून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे भाई जगताप यांच्या विरोधातील नाराजीचा सुर आळवला असल्याच्या चर्चा होत्या. जनाधार असलेल्या नेत्यांना दूर करत आपल्या जवळच्या लोकांना आणि सचिव यांना एआईसीसीचे सदस्य बनवण्याचा आरोप भाई जगताप यांच्यावर केला असल्याचे समजते.


वर्षा गायकवाड यांची गांधी घराण्यासोबत जवळीक -माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांची काँग्रेस घराण्याशी जवळीक असल्याचा सर्वांना माहीत आहे. याचा प्रत्यय आपल्याला पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या वेळी आला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्मिता देव यांनी अचानक राजीनामा देऊन तृणमुल काँग्रेससोबत गेल्या होत्या, त्यावेळी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. वर्षा गायकवाड यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य बनवले होते.


वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांना मंत्री, खासदार आणि मुंबई शहराध्यक्ष पदाचा दांडगा अनुभव होता. वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव वर्षा गायकवाड यांना आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वर्षा गायकवाड यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. याचा फायदा निश्चितच मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड हे होते. काँग्रेसने खांदेपालट करत 19 डिसेंबर 2020 साली भाई जगताप यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली. शुक्रवारी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा गायकवाड यांच्या घरात, म्हणजेच आमदार वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात घातली आहे. काँग्रेसला कर्नाटक राज्यात मिळालेल्या बहुमतामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम ठेवण्यात वर्षा गायकवाड यांना किती यश येते हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details