यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी राज्याच्या विधानभवनाचा झाला 'राजकीय आखाडा'
आज राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने विधानभवन परिसरात राजकीय नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली. यामध्ये राज्यातील नव्या सरकारमध्ये सामील असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या मनधरणीसाठी आलेल्या नेत्यांचाही समावेश होता.
मुंबई- राज्यात स्थापन झालेले भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारबाबत सर्वोच्च न्यायालय नक्की काय निर्णय घेणार याबाबत टांगती तलवार कायम आहे. नव्या सरकारबाबत संभ्रम असतानाच आज सकाळपासून मुंबईतील विधानभवन हे राजकीय आखड्याचे केंद्र बनल्याचे चित्र पाहायला मिळाले. याला महाराष्ट्राचे शिल्पकार यंशवतराव चव्हाण यांचा स्मृतिदिनाचे कारण ठरले आहे.
सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लगेचच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात आले. त्यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करून विधानभवन गाठलं. मात्र, त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँगेसचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील हे देखील विधानभवनात आले. त्यांनी पुन्हा एकदा अजित दादाची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सुद्धा विधानभवनात आले आणि त्यांनीही मनधरणीसाठी जोर वाढवला असल्याची चर्चा आहे. मात्र तेवढ्यात सुनील तटकरे विधानभवनातून बाहेर आले आणि माध्यमाचा गराडा बाजूला करून काहीही न बोलता निघून गेले.