मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० फेब्रुवारी रोजी मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी मीडिया आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. आजपासून प्रवाशांना या ट्रेनमधून प्रवास करण्याची संधी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आज सोलापूर आणि शिर्डीसाठी रोज दोन ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
चांगली सुविधा असल्याने तिकीट जास्त :चांगली व्यवस्था असल्याने भाडे अधिक आहे. ज्या लोकांना अर्जंट जायचे आहे, नॉनस्टॉप जायचे आहे त्यांच्यासाठी ही ट्रेन चांगली आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून ते आपल्या नियोजित ठिकाणी लवकर पोहचणार आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात इतर ट्रेनमध्ये ज्या समस्या ट्रेनमध्ये असतात त्या समस्या या ट्रेनमध्ये एसी असल्याने प्रवाशांना जाणवणार नाहीत. या ट्रेनमध्ये तिकिटासोबत नाश्ता आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया रत्नाकर मुळी, सोमेश कुलकर्णी या प्रवाशांनी दिली.
किती आहे तिकिटाचा दर:वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुणे येथे जाण्यासाठी चेअर कारसाठी ५६० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये तिकीट आहे. मुंबई ते नाशिक जाण्यासाठी चेअर कारसाठी ५५० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११५० रुपये तिकीट आहे. मुंबई ते शिर्डी प्रवासासाठी चेअर कारसाठी ८०० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १६३० रुपये तिकीट आहे. तर मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी चेअर कारसाठी ९६५ रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १९७० रुपये तिकीट आहे.