मुंबई : भारतीय रेल्वेची अर्ध-द्रुतगती ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर उद्या १० फेब्रुवारीपासून धावणार आहे. या ट्रेनला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवणार आहेत. या ट्रेनच्या गतीमुळे तसेच धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम या ट्रेनमुळे होणार आहे. यामुळे ही ट्रेन खास आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली.
यामुळे ट्रेन खास आहे :उद्या पासून सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आज मीडियाला दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १८ नंबर प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली. या ट्रेनची माहिती देताना महाव्यवस्थापक नरेश लालवाणी बोलत होते. यावेळी बोलताना, १८५३ मध्ये बोरीबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली ट्रेन चालवण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईमधून अशी ट्रेन पहिल्यांदा सुरु होत आहे. या मार्गावर दोन घाट आहेत. या घाटांवर ट्रेनला मागून धक्का देण्यासाठी बँकर लावावे लागतात. या ट्रेनला तसे बँकर लावण्याची गरज पडलेली नाही. ती आपल्या गतीमुळे घाट पार करत आहे.
धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम : दोन ट्रेन एकाच दिवशी सुरु होणे हे भारतात कढीही कुठेही झाले नाही. ते मुंबईमध्ये होत आहे. तसेच धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम ही ट्रेन करत आहे. नाशिक मध्ये त्रंबकेश्वर, शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन तसेच सोलापूर येथे सिद्धेश्वर पंढरपूर या धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम या ट्रेनमुळे होणार आहे. सहा तासात ही ट्रेन आपले अंतर पार करणार आहे. १६ डब्बे आहेत. सर्व मिळून ११८८ सीट्स यामध्ये आहेत अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली.
अशी झाली चाचणी :मध्य रेल्वेवर मुंबई पुणे मार्गावर लोणावळा आणि खंडाळा यासारखे मोठे घाट आहेत. या घाटावर मेल एक्सप्रेस गाड्यांना आणखी एक अतिरिक्त इंजिन म्हणजेच बँकर्स लावावे लागते. घाट विभागात बॅंकर्सचा वापर गाड्या ढकलण्यासाठी केला जातो. डबे तुटल्यास ट्रेन मागे जाण्याच्या घटना टाळल्या जातात. परंतु बँकर्सला जोडण्याच्या आणि विलग करण्याच्या प्रक्रियेस किमान काही मिनिटे लागतात. तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. हा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांनी बँकर न जोडता या दोन्ही मार्गांवर सेमी हाय-स्पीड गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकर्स न लावता या ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे अशी, माहितीही महाव्यवस्थापकांनी दिली.
किती तासात प्रवास होणार :वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ६.१५ वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता शिर्डी येथे पोहोचेल. त्याच दिवशी ही एक्प्रेस शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ११.१८ मिनिटांनी एक्स्प्रेस मुंबईत पोहोचेल. या एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी अंतर पार करण्याठी ५ तास ३० मिनिटे लागणार आहेत.