महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vande Bharat Train : 'वंदे भारत एक्सप्रेस'वर प्रवासी नाराज; 'हे' आहे कारण

वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाल्यानंतर मुंबई ते शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे लोकल रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचा आरोप प्रवाशी संघटनांनी केला आहे. वंदे भारतमुळे लोकल ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Vande Bharat Train
वंदे भारत एक्सप्रेस

By

Published : Feb 26, 2023, 6:42 PM IST

रेल्वे प्रवाशी संघटनेचे राजेश घनघाव प्रतिक्रिया देताना

मुंबई: शहरातून मोठ्या थाटात वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली. मात्र आता हीच ट्रेन कल्याण-कसारा वासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना कामावर जाण्यासाठी तसेच घरी जाताना नेहमीचा उशीर होऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. लोकल प्रवाशांना कोणताही त्रास न होता वंदे भारत ट्रेन चालवा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

वंदे भारत एक्सप्रेस: कमी वेळामध्ये जास्त अंतर कापणारी सेमी हाय स्पीड रेल्वे म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते. १० फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. या सेमी हायस्कूल रेल्वेमुळे मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अंतर साडेपाच ते सहा तासात कापणे शक्य झाले आहे. तसेच या रेल्वेने शिर्डी, सोलापूर, नाशिक आदी विभागातील धार्मिक स्थळे जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही रेल्वे लाभदायक ठरली आहे.

मुंबई-शिर्डी ट्रेनला अल्प प्रतिसाद: वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी या मार्गावर चालते. या ट्रेनमुळे थेट मुंबईमधील नागरिकांना शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेता येते आणि त्यानंतर पुन्हा मुंबईला परतता येऊ शकते अशा रीतीने ही ट्रेन चालवली जाते. मात्र या ट्रेनला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. यासाठी प्रवाशांची संख्या वाढवता यावी म्हणून रेल्वेने आता या ट्रेनच्या तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना साईबाबांचे दर्शन घेण्याचा व्हीआयपी पास आणि त्याचबरोबर मंदिरातील प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तरी या ट्रेनचे प्रवासी वाढतील, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाला आहे.

रेल्वे प्रवासी संतप्त: वंदे भारत एक्सप्रेससाठी इतर रेल्वे आणि एक्सप्रेस गाड्या ट्रॅक वरून बाजूला काढाव्या लागतात किंवा त्यांना मध्येच कुठेतरी थांबवावे लागते. यामुळे ट्रेन मधील सामान्य प्रवासी तसेच मेल एक्सप्रेस मधील प्रवासी यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वंदे भारत एक्सप्रेस मुळे रेल्वे आणि मेल एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांना त्यांच्या प्रवासात उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेली आहे.

लोकल ट्रेनला बाधा नको: वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. यासाठी साईबाबा दर्शनाचा व्हीआयपी पास आणि प्रसाद देण्यासारखी आमिषे प्रवाशांना दाखवली जात आहेत. कल्याण ते कसारा आणि कर्जत या दरम्यान एक ते दीड तासाने ट्रेन धावतात. याठिकाणी ट्रेनची संख्या खूप कमी आहे. पहिल्या दिवशी वंदे भारत ट्रेनला कल्याण आणि कसारा येथे थांबा देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कल्याण आणि कसारा येथील थांबा रद्द करण्यात आला. ठाण्याहून ट्रेन थेट नाशिकला जाते. रेल्वे प्रशासन येथील प्रवाशांना ऑफिसच्या वेळेत लोकल ट्रेन देत नसतील तर या वंदे भारत ट्रेनचा काय उपयोग आहे. कल्याण ते कसारा मार्गावर लोकल ट्रेन वाढवा त्याचसोबत लोकल ट्रेनला कोणतीही बाधा न येता वंदे भारत ट्रेन चालवावी, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे.


हेही वाचा: Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनची सुविधा उत्तम, पण...; प्रवाशांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details