Maharashtra politics: 'वंचित' महाविकास आघाडीत सामील होणार का? जाणून घ्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया - काँग्रेसचे प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी
मुंबई -राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष निवडणूक तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना( ठाकरे गट )आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसला तरी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्ष वेगवेगळे प्रकारचे स्पष्टीकरण देत आहे. अशातच वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू आहेत.
वंचित बहुजन विकास आघाडी
By
Published : May 26, 2023, 10:13 AM IST
|
Updated : May 26, 2023, 11:06 AM IST
वंचितच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत अजूनही प्रश्नचिन्ह
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवरून केलेले विधान राजकारणात चर्चेचे ठरले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सोडून एकत्र लढू, असे उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. वंचितशिवाय कोणीही सत्तेत येणार नाही. महाविकास आघाडीच्या नादाला लागाल, तरी बळी जाईल, असा सूचक सल्लादेखील दिला आहे. दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा सर्वाधिक कमकुवत असल्याची टीका केली आहे. अशा परिस्थितीत वंचितच्या महाविकास आघाडीमधील सहभागावरून राजकीय पक्षांचे प्रवक्ते व राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया ईटीव्ही भारतने जाणून घेतल्या आहेत.
महाविकास आघाडी सोबत स्वतंत्र बोलणी नाही-वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळ म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीने आपले राजकीय मूल्य वेळोवेळी सिद्ध केले आहे. जनमानसातून मिळणारा प्रतिसाद आणि पाठिंबा वाढत असल्यामुळे वंचित आघाडीचे ताकद ग्रामीण आणि शहरी भागात वाढल्याचे दिसत आहे. 2019 च्या नंतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्येदेखील वंचितला चांगले यश मिळाले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचितच्या महाविकास आघाडातील समावेशाबद्दलची बोलणी करणार असल्याचे म्हटले होते. आतापर्यंत महाविकास आघाडीत समावेशाबाबत शिवसेनेकडून ( ठाकरे गट) कुठलाही निरोप आलेला नाही.
वंचित आणि शिवसेना ठाकरे गट आमच्यातील युतीतील चर्चा सातत्याने सुरू आहेत. मुंबई महापलिका निवडणूक संदर्भात आमच्या विभागवार बैठका दोन्ही पक्षाचे नेते करत आहेत. महाविकास आघाडीबाबत सध्या कुठलंही स्वतंत्र बोलणी सुरु नाही- वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळ
वंचितमुळे काँग्रेस,राष्ट्रवादीचे नुकसान- काँग्रेसचे प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी म्हणाले, की गेल्या काळातील महाराष्ट्रामधील इतिहास बघितला तर वंचित भाजपाची बी टीम म्हणून काम करते. वंचितने अनेक वेळा भाजपला मदत केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. नेहमीच वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नुकसान झाले असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ता कुलकर्णी यांनी केला आहे.
समविचारी पक्षांचे स्वागत- प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले, की भाजपला सक्षम पर्याय देऊन सत्तेपासून दूर करायचे असेल तर समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. त्यामुळे राज्यात भाजप विरोधात लढा उभा करायचा आहे. वंचित देखील येऊ शकतात. त्यांचे स्वागतच केले जाईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्रास्टो यांनी दिली आहे. वंचितचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. महाविकास आघाडीत वंचित सामील होणार की नाही याविषयीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे.
जागा वाटपाबाबत फॉर्म्यूला महत्त्वाचा-राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन म्हणाले, की भिमसेना आणि शिवसेना यांच्या युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. त्यामुळे वंचितची शिवसेनेसोबत (ठाकरे गट) युती आहे. वंचितला महाविकास आघाडीत सामील करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होणे हा गौण भाग आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपल्या सोबत येणाऱ्या मित्रपक्ष किंवा घटक पक्षांना आपापल्या कोट्यातून जागा द्यायच्या आहेत. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत वंचितला सोबत घेऊन जागा वाटपाबाबत कोणता फार्म्यूला ठरतो यावर वंचितच्या समावेशाबद्दलचे निर्णय अवलंबून असणार आहे-राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन
सध्या केवळ चर्चा सुरू-लोकसभा 2019 निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीने काँग्रेसच्या सात उमेदवारांहून अधिक मते मिळविली होती. नांदेड, हातकणंगले, बुलढाणा, गडचिरोली चिमूर, परभणी, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. भविष्यातील निवडणुकीमध्ये वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. त्यामुळे सध्या वंचितचा महाविकास आघाडीत भवितव्य काय यावर चर्चा रंगताना दिसत आहे.