महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट नुकसान भरपाई द्या - रेखा ठाकूर

By

Published : Oct 1, 2021, 12:43 PM IST

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, केळीसह हाताशी आलेली सर्व पीकं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ पैसे जमा करावेत, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.

Rekha Thakur
Rekha Thakur

मुंबई :अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस, केळीसह हाताशी आलेली सर्व पीकं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ पैसे जमा करावेत, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.

तातडीने मदत करा- रेखा ठाकूर

'पावसानं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पीकं नष्ट झाली आहेत. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून तत्काळ मदत मिळणं गरजेचं आहे. सरकारकडून फक्त पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत. यापलीकडे काही केलं जात नाही. सरकारने हे ढोंग बंद करून तातडीने नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी', असे रेखा यांनी म्हटले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा - रेखा ठाकूर

'पावसामुळे सरकारी ३३% नुकसानीच्या निकषांहून अधिक पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणं गरजेचं आहे. ओल्या दुष्काळात कोरडवाहू शेतीसाठी जवळपास १३ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बागायती शेतीसाठी जवळपास १८ हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई जाहीर होते. ही नुकसानभरपाई अपुरी आहे. अल्पबाधित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आणि जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी', अशी मागणी रेखा ठाकूर यांनी केली आहे.

'मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. पुन्हा मुख्यमंत्री दौरा करणार आहेत, असे जाहीर केले आहे. हे सरकारने बंद करावे', असे आवाहन देखील वंचितच्या वतीने करण्यात आले आहे.

'शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा'

'थकित वीज बिलाच्या नावावर शेतकऱ्यांचा सक्तीने वीज पुरवठा खंडित करण्याचे काम वीज मंडळाच्या वतीने सुरू आहे. याचा वंचित बहूजन आघाडी विरोध करते. अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाऊ नये', अशी मागणी देखील वंचितच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली.

हेही वाचा -महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका, जाणून घ्या नवी किंमत

ABOUT THE AUTHOR

...view details