प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मोकळे मुंबईVanchit Bahujan Aghadi On India Alliance : इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील अन्य पक्षांच्या समावेशाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी या पक्षाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.
वंचितचा इंडिया आघाडीत समावेश :या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं की, दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. ही बैठक अत्यंत उत्साही वातावरणात आणि अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारी होती. यामध्ये इंडिया आघाडीत पक्षांचा समावेश करण्यावर विस्तृत चर्चा झाली. तसंच या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातून समाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
वंचितचा अद्याप समावेश नाही : या संदर्भात बोलताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, संजय राऊत यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया आघाडीत झाल्याचं जाहीर केलं. मात्र ही धुळफेक आहे. अजूनही आम्हाला कुठलंही निमंत्रण पाठवण्यात आलेला नाही, किंवा आमच्याशी कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाही. जोपर्यंत आम्हाला अधिकृत निमंत्रण पाठवले जात नाही किंवा जागा वाटपा संदर्भात आमच्याशी चर्चा केली जात नाही. तोपर्यंत या बातमीत काहीही तथ्य नाही, असं ते म्हणाले.
अधिकृत निमंत्रण पाठवलं नाही: ९ जानेवारी रोजीच्या बैठकी संदर्भात आम्हाला कल्पना होती. इंडिया आघाडीचे, महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र बसले. तिथे वंचित बहुजन आघाडीच्या समावेशा संदर्भात चर्चाही झाल्याचं आम्हाला समजलं. मात्र निर्णय काय झालाय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला अधिकृत निमंत्रण पाठवलं जात नाही आणि आमच्याशी जागा वाटपाची चर्चा होत नाही. तोपर्यंत या बातमीवर विश्वास ठेवू नये. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचीच आमची भूमिका आहे. त्यासाठी इंडिया आघाडीत समाविष्ट होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू.
वंचितची अस्तित्वासाठी धडपड: वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीत स्वतंत्र बऱ्यापैकी मते मिळाली. मात्र त्यांना जागा मिळू शकल्या नाहीत. वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातील काही मतदारसंघांवर निश्चितच प्रभाव टाकणारी आहे. मात्र खात्रीने जागा जिंकून येतील अशा एक-दोन ठिकाणीच वंचितचा प्रभाव आहे. वंचितला आपली ताकद माहीत आहे. गत निवडणुकीनंतर वंचितकडं भाजपाची बी टीम म्हणून पाहिलं जात होतं. हा शिक्का पुसण्यासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आता वंचितला महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी सातत्याने आपला समावेश इंडिया आघाडीत व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केलंय.
हेही वाचा -
- 'इंडिया आघाडी'च्या भीतीनं भाजपाला पोटदुखी - काँग्रेस
- लोकसभा निवडणुकीत 'इंडिया आघाडी' 400 जागांवर भाजपाला टक्कर देण्याच्या तयारीत, वाचा खास रिपोर्ट
- इंडिया आघाडीचा व्हीव्हीपॅटवर सवाल; निवडणूक आयोगाला जयराम रमेश यांचं पत्र