मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरील टीकेमुळे काँग्रेस दुखावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आंबेडकर यांनी घेतलेला पंगा आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला टक्कर देताना, वंचितसह महाविकास आघाडी अभेद्य राखताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला दूर करत अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती : शिवसेना, भाजप यांच्यात सत्तेवरुन दुरावा आला होता. त्यामुळे ठाकरेंनी भाजपला नमवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली होती. अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी सहा महिन्यापूर्वी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली असून दिवसागणिक ठाकरेंच्या सेनेत इनकमिंग आऊटगोइंग सुरू आहे. मात्र, सेनेतील फुटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. आता वंचित आघाडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली आहे.
शिवसेनेला आघाडी शिवाय पर्याय नाही :शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारीला युतीची घोषणा केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या नव्या युतीने राज्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार झाले. युतीची घोषणा करताना उध्दव ठाकरे यांनी वंचितच्या युतीबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे स्पष्ट केले होते. भाजपला राज्यात रोखायचे झाल्यास शिवसेनेला वंचितसह महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. मात्र, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित एकत्र आलेले अद्याप रुचलेले दिसत नाही.