मुंबई: भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड जागा रिक्त झाल्या होत्या. या जागेवर आता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. कसबा निवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी मिळणार आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेसला पाठिंबा देणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत आलेल्या वंचितच्या उमेदवाराने कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे वंचितच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
बिनविरोध निवडणुकीला वंचितचा विरोध :बिनविरोध निवडणुकीची प्रथा पाडू नये, अशी स्पष्ट भूमिका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. एखाद्या लोकप्रतिनीचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरातील उमेदवाराला पोटनिवडणुकीत तिकीट द्यायची आणि निवडणूक बिनविरोध करायची, ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांनी नवीन कार्यकर्ता निवडून द्यावा या मताचा मी आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. तसेच ठाकरे गटाने उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र काँग्रेसचा उमेदवार असल्याचे वंचितची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणुकी संदर्भात लवकरच भूमिका:वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती नंतर कसबा आणि पिंपरी चिंचवड येथे होत असलेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेना लढत नसल्याचे दिसत आहे. महविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा अद्याप काही संबंध नसल्याने या दोन्ही जागे संदर्भात पक्षाच्या वतीने लवकरच भूमिका जाहीर करण्यात येईल, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.
खंत आहे पण नाराजी नाही : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे लागलेल्या कसबा पोट निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना तिकीट दिले. त्यानंतर आता नाराजी समोर येताना दिसत आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचे नाव सुद्धा यामध्ये प्रमुख दावेदार म्हणून घेतले जात होते. परंतु कसबातून भाजपने तिकीट दिले नाही, याची खंत आहे पण नाराजी नाही. अशी प्रतिक्रिया आता शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.