महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचितचा काँग्रेसला ४० जागांचा प्रस्ताव गंमतीशीर - सचिन सावंत

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरात ४१ लाख मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली आहे. हा प्रस्ताव अत्यंत गंमतीशीर असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

वंचितचा काँग्रेसला प्रस्ताव

By

Published : Jul 4, 2019, 3:19 PM IST


मुंबई - वंचित बहुजन आघाडीने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली आहे. यावर ईटीव्ही भारतने काँग्रेसची प्रतिक्रिया जाणून घेतली. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा प्रस्ताव अत्यंत गमतीशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच समविचारी पक्षांशी बोलणे सुरु असल्याचेही सावंत यांनी सांगितले. दरम्यान, वंचितचे नेते गोपीचंद पडळकर हे काँग्रेसला ४० जागा देण्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसला कमी लेखत वंचित स्वत:ची जमीन मजबूत करत आहे की, भाजप शिवसेनेच्या विजयासाठी मैदानात उतरत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरात ४१ लाख मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली आहे. जर काँग्रेसने ही ऑफर स्वीकारली नाहीतर वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या २८८ जागा लढवेल. काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य असेल तर त्यांनी येत्या १० दिवसात उत्तर द्यावे, अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचितच्या या ऑफरवरुन त्यांना एवढा आत्मविश्वास येतो तरी कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे.


लोकसभा निवडणुकीत जवळपास १० ठिकाणी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फटका बसला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत वंचितसोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा करण्याची भूमिका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी घेतली होती. मात्र, वंचितनेच काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिल्याने आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, वंचितला एवढा आत्मविश्वास आला कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी अपयश आले आहे. तर काँग्रेसलाही एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

प्रस्ताव मान्य न झाल्यास सर्वच जागा लढवणार - गोपीचंद पडळकर

काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीने ४० जागांचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नसल्यास आम्ही सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी दिली. मात्र, काँग्रेसकडून कोणताही निर्णय आला नसल्याचे पडळकर म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मध्यभागी राहणार असल्याचे पडकळर म्हणाले. तसेच समविचारी पक्षांना बरोबर घ्यायला आम्ही तयार आहोत. २०१४ ची निवडणूक आणि २०१९ ची निवडणूक यामध्ये आता खूप फरक असल्याचेही पडळकर म्हणाले.


२०१९ लोकसभा निवडणूक (महाराष्ट्र)

भाजप - २३ जागा
शिवसेना - १८ जागा
राष्ट्रवादी - ५ जागा (१ जागा मित्रपक्ष)
काँग्रेस - १ जागा
वंचित बहुजन आघाडी - १ जागा

२०१४ विधानसभा निवडणूक (पक्षीय बलाबल)

भाजप - १२२
शिवसेना - ६३
काँग्रेस - ४२
राष्ट्रवादी - ४१
अपक्ष -७
बहुजन विकास आघाडी - ३
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) - ३
मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एम.आय.एम) - २
भारीप बहुजन महासंघ - १
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) - १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - १
राष्ट्रीय समाज पक्ष - १
समाजवादी पार्टी - १

ABOUT THE AUTHOR

...view details