महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इतर राज्यात वाया गेलेल्या लस महाराष्ट्राच्या नावाने खपवल्या जातायत, आरोग्यमंत्री संतापले

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात लसीवरून शीतयुध्द पाहायला मिळत आहे. राज्याला आणखी लसीची गरज असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी म्हटले आहे. तर, ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 5 लाख डोस वाया गेल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी म्हटले आहे.

rajesh tope
राजेश टोपे

By

Published : Apr 9, 2021, 12:54 PM IST

मुंबई : इतर राज्यात वाया गेलेल्या लसी ह्या महाराष्ट्राच्या नावाने खपवल्या जात आहेत. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्याहून कमी आहे, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे.

राजेश टोपेंचे प्रकाश जावडेकरांना प्रत्युत्तर

महाराष्ट्राला 40 लाख डोसची गरज

कोरोनामुळे सध्या राज्याची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्र सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत. राज्याकडे केवळ एक दिवसाचा लसीकरणाचा साठा शिल्लक आहे. अशी परिस्थिती असताना केंद्राकडून महाराष्ट्रसाठी दर आठवड्याला 40 लाख लस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे सातत्याने करत आहेत. मात्र, अद्याप तरी त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.

प्रकाश जावडेकरांचे ठाकरे सरकारवर आरोप

राजेश टोपेंनी लस देण्याची मागणी केंद्राकडे केली. पण, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे जवळपास पाच लाख लसी वाया गेल्या आहेत, असे जावडेकरांनी म्हटले आहे.

जावडेकरांना टोपेंचे उत्तर

इतर राज्यात वाया गेलेल्या लसी ह्या महाराष्ट्राच्या नावाने खपवल्या जात आहेत. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्याहून कमी आहे, असे राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे ट्विट टोपेंनी केले आहे.

टोपेंचे सरकारवर आरोप

काल (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या उपलब्ध असलेल्या लसीवर स्पष्टीकरण दिलं. केवळ नऊ लाख लस सध्या राज्य सरकारकडे आहे. सातारा, सांगली, पनवेल येथील लसीकरण केंद्र बंद करायची वेळ राज्य सरकारवर आली आहे. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप लस वाढवून दिली नाही. दर आठवड्याला राज्याला 40 लाख लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी टोपेंनी केली. राज्यात दर दिवसाला साडेचार लाख लोकांना लस दिली जाते. पुढील काही दिवसातच हा आकडा दहा लाखांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे ज्या गतीने राज्य सरकार लसीकरण करत आहे, त्या गतीने केंद्र सरकार लस उपलब्ध करून देत नसल्याची खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

लसीवरून ठाकरे सरकारचं राजकारण

ठाकरे सरकार लसीकरणा संदर्भात राजकारण करत आहे. अजूनही राज्याकडे पाच ते सहा दिवस पुरेल एवढा लसीचा साठा आहे, असे प्रकाश जावडेकरांनी म्हटले आहे.

हेही वाचा -राज्य सरकार लसीकरणासाठी सज्ज, केंद्राने मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

हेही वाचा -वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details