महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Outbreak: मुंबईत गोवरची साथ; पहिल्याच दिवशी १३० मुले आणि गरोदर महिलांचे लसीकरण

Measles Outbreak: पालिकेच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सूरु केली आहे. गोवंडी विभागात एकूण ६९२१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आज पहिल्या दिवशी १३० मुले आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानी दिली.

Measles Outbreak
Measles Outbreak

By

Published : Nov 10, 2022, 10:39 PM IST

मुंबई: मुंबईमध्ये झोपडपट्टी विभागात मिसेल रुबेला म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत ८४ रुग्ण आढळून आले असून १ मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ मुलांचे मृत्यू हे संशयित आहेत. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सूरु केली आहे. गोवंडी विभागात एकूण ६९२१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आज पहिल्या दिवशी १३० मुले आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

६९२१८ घरांचे सर्वेक्षण, १३० जणांचे लसीकरण:मुंबईमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापासुन गोवर आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले असून एकूण ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. एम पूर्व म्हणजेच गोवंडी विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर आजपासून आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जिवनसत्व 'अ' देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास जवळच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. तसेच ९ महीने व १६ महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाचे अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येत असून वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. एम पूर्व गोवंडी विभागात एकूण ६९२१८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १२२ मुलांचे आणि ८ गरोदर महिलांचे एकूण १३० जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ. गोमारे यांनी दिली.

लसीकरण करून घ्या:मुंबईमधील झोपडपट्टी विभाग असलेल्या मानखुर्द गोवंडी एम ईस्ट, एम वेस्ट, जी नॉर्थ धारावी, कुर्ला एल वॉर्ड, पी नॉर्थ मालाड येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून या याठिकाणी रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. विशेष करून गोवंडी विभागात रुग्णांची संख्या अधिक असल्याने मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईकरांनी लहान मुलांचे वेळीच मिसेल रुबेलावरील लस द्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details