मुंबई - मुंबई महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसली. लवकरच कोरोनावर लस उपलब्ध होणार आहे. पालिका दरदिवशी 10 हजार लसी देणार आहे. त्यात वाढ करून ही क्षमता दररोज 50 हजार लसी देण्यापर्यंत वाढवली जाईल. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना एक लस देण्यासाठी 15 दिवस लागणार होते. मात्र एका आठवड्यात हे लसीकरण पूर्ण करू, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
जंबो सेंटरमध्येही लसीकरण
मुंबईत कोरोनाचा फैलैव वाढल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने बीकेसी (वांद्रे), नेस्को (गोरेगाव), एनएससीआय (वरळी), महालक्ष्मी, दहिसर, मुलुंड अशा ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारली होती. तेथे आता रुग्णसंख्या कमी असल्याने या जम्बो कोविड सेंटरचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. मात्र बाधित रुग्ण आणि लसीकरणासाठी आलेले नागरिक यांचा संबंध येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. दोन्ही विभागासाठी स्वतंत्र मार्ग असतील असेही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण एका आठवड्यात
आटोक्यात येणारा कोरोना, लवकरच उपलब्ध होणारी लस आणि लसीकरण या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना 15 दिवसात लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना एका आठवड्यात देऊन लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल, असेही काकाणी म्हणाले.