मुंबई :महाराष्ट्राकडे कोरोना लसीचा साठा पुरेसा नाही. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण मोहीम सुरू करता येणार नाही. कमीत कमी 20 ते 25 लाख लसीचा साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात 1 मे पासून लसीकरण सुरू करता येणार नाही - राजेश टोपे आज (29 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेबद्दल देखील चर्चा झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. 'राज्याकडे जवळपास 20 ते 25 लाख लसीकरणाचा साठा असल्यास लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल. तसेच हा पुरवठा सातत्याने केंद्र सरकारकडून सुरू राहिल्यास लसीकरण सुरळीत सुरू राहील. सध्या कोविशिल्ड या लस उत्पादक कंपनीने केवळ तीन लाख लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र राज्य सरकारला दिले आहे. पण केवळ तीन लाख लस मिळून लसीकरण मोहीम सुरू करता येणार नाही', अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
कंपन्यांनी लसीची किंमत केली कमी कोविशिल्ड या लस उत्पादक कंपनीने आपल्या लसीचा दर 100 रुपयाने कमी केला आहे. 400 रुपयाला मिळणारी कोविशिल्डची लस आता 300 रुपयाला राज्य सरकारला मिळेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचेही पैसे वाचणार आहेत. यामुळे राज्य सरकारलाही काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच कोवॅक्सिन लस उत्पादक कंपनीने देखील लसीचे दर कमी केले आहेत. कोवॅक्सिनच्या लसीचे दर आधी 600 रुपये होते, आता 200 रुपयांनी कमी करून 400 रुपये करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे टोपे यांनी सांगितले.