मुंबई -राज्य सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयात इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. न्यायालयाने परीक्षा घेण्याचे म्हटले आहे, तर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा घेतल्यास कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होईल, असे म्हटले आहे. याबाबत अद्याप कुठला निर्णय झाला नसतानाच शिक्षक भारतीचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आधी लक्ष द्या आणि त्यानंतरच परीक्षा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिक्षकांकडे दुर्लक्ष -
राज्यभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने राज्य शासनाने ताण कमी करण्यासाठी राज्यातील शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना विलगीकरण कक्ष, सर्वेक्षण, चेक पोस्ट व अन्य ठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे. अशा ठिकाणी कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. तरी सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपली सेवा देत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना ड्युटी लावलेला शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी सातत्याने शिक्षक संघटनाकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकार यावर दुर्लक्ष करत आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरून गोधळ सुरु आहे. अशात शिक्षक भारतीचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधी लक्ष द्या आणि त्यानंतरच परीक्षा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.