मुंबई- गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, कोरोनामुळे या उत्सवाचा आनंद व डामडौल कमी झाला आहे. तसेच, व्यव्सयाला देखील फटका बसल्याने व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. ग्राहकही कमी झाली आहेत. अशातच उत्साही संस्थेचे नानासाहेब शेंडकर यांनी सुमारे ५० टक्के कमी दरात पर्यावरणपुरक मखर विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. नागरिकांना उत्सहात गणेश उत्सव साजरा करता यावे, यासाठी त्यांनी किंमती कमी केल्या आहेत.
नफ्यात असलेला थर्माकोल कारखाना २००१ साली बंद करून उत्सवी संस्थेच्या माध्यमातून नानासाहेब शेंडकर हे पर्यावरणपुरक मखरांची निर्मिती करत आहेत. गेल्या १९ वर्षांपासून ते इको फ्रेंडली मखर बनवत आहेत. मागील वर्षी दिवाळी निमित्त नानासाहेब यांनी गड-किल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या कंदिलांची निर्मिती केली होती. तसेच यावर्षीही लोकांना उत्साहात गणेशोत्सव साजरा करता यावा या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या मखरांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट केली आहे.