मुंबई- शहरातील जेजे रुग्णालयात पुरुषाच्या शरीरात महिलेचे गर्भाशय आढळून आले आहे. संबंधित २९ वर्षीय तरुणाचे २ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला बाळ होत नसल्याने तो तपासणीसाठी आला असता हा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून स्त्री अवयव बाहेर काढण्यात आले.
संबंधीत तरुण जेजे रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. त्यावेळी डॉ. गीते यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचे दोन्ही अंडाशय पोटात होते. त्यानंतर तो स्त्री आहे की पुरुष आहे याची चाचणी करण्यात आली. मात्र, तो लैंगिकरित्या पुरुषच होता. त्यानंतर अंडाशय अंडकोषामध्ये आणण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. मात्र, त्याच्या अंडाकोषाला एक स्त्रीचा अवयव चिकटलेला होता. त्यामुळे एमआरआय करण्यात आले. त्यानंतर तो स्त्रीचाच अवयव म्हणजे गर्भाशय असल्याचे समजले.
अंडाशयापासून निघालेली वीरनलिका त्या गर्भाशयाला चिकटलेली होती. गर्भाशय काढल्याशिवाय अंडाशय अंडकोषामध्ये आणता येत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला गर्भाशय काढण्यात आले. त्यानंतर अंडाशय अंडकोषामध्ये नेण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली, असल्याचे डॉक्टर गीते यांनी सांगितले.