मुंबई - न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून आरोपींना जामीन रहाणाऱ्या एका आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. इरफान मुबारक अली शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. तो गोवंडीतील शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. हा आरोपी चक्क न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून आरोपींना जामीन मिळवण्यात मदत करत असे.
बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपींना जामीन राहणाऱ्या आरोपीला अटक... मुंबई गुन्हे शाखेकडून काही दिवसांपासून बनावट कागदपत्रे सादर करून आरोपींना न्यायालयात जामीन रहाणाऱ्याचा शोध सुरु होता. या शोधकार्यात गुन्हे शाखेला मुंबई उपनगरातील शिवाजीनगर, गोवंडी भागात याप्रकारे काही टोळ्या आणि काही लोक बनावट कागदपत्र सादर करून आरोपींना जामीन देऊन त्यांची सुटका करत आहेत आणि त्या बदल्यात पैसे घेत आहेत, अशी माहिती मिळाली.
हेही वाचा...कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य पोलीस सक्षम - अनिल परब
हि माहिती गुन्हे शाखेने मुलुंड न्यायालयाला देखील दिली होती. मुलुंड न्यायालयाने मुलुंड पोलिसांना एका गुन्ह्यात अशाप्रकारे एक जामीनदार त्या विभागातील असल्याचे कळवले होते. मुलुंड पोलीस ठाण्यात 2017 साली दानिश अन्सारी या घरफोडी करणाऱ्या आरोपीला इरफान हा जामीनदार होता. त्याने तो एम्पायर इंजिनियरिंग कार्पोरेशन या कंपनीत इलेक्ट्रिक विभागात काम करत असल्याचे ओळखपत्र आणि सॅलरी स्लिप दिली होती. या बाबत मुलुंड पोलिसांनी चौकशी केली असता, सदर जामीनदार इरफान हा त्या कंपनीत कामाला नसल्याचे पोलिसांना कळले.
मुलुंड पोलिसांनी शिवाजीनगर भागात या आरोपीचा शोध सुरु केला आणि त्याला गुरुवार दि 13 फेब्रुवारी रोजी अटक केली. या अटक जामीनदाराला जामीन राहण्यासाठी पाच हजार रुपये देण्यात आले होते. अशा प्रकारे या आरोपीने खोटी कागदपत्रे न्यायालयात देऊन आणखी कोणाला जामीन दिले आहेत का? याचा पोलीस आता तपास करत आहे.