महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2020, 12:26 PM IST

ETV Bharat / state

उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी? राजकीय चर्चांना उधाण

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या रिक्त जागेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकर

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी मातोंडकर यांना शिवसेनेकडून विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना फोनवरून संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

उर्मिला मातोंडकर यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

उर्मिलाने घेतला होता कंगनाचा समाचार..

मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर टीका करण्यासाठी भाजपाकडून अभिनेत्री कंगना रणौत हिला पुढे करण्यात आले होते. त्यावेळी मातोंडकर यांनी कंगनाला चांगलेच धारेवर धरत तिचा समाचार घेतला होता. याच पार्श्वभूमीवर मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेत मातोंडकर यांच्यासारखा मराठी अभिनेत्रीचा चेहरा आल्यास त्याचा मोठा लाभ शिवसेनेला होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबई मधून उमेदवारीही देण्यात आली होती. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत यश आले नव्हते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र, राज्यातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी आपली भूमिका मात्र कायम ठेवली होती.

इतर चौघांना डावलून मातोंडकर यांना संधी?

दरम्यान, शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त चार सदस्यांच्या नावांमध्ये प्रामुख्याने सचिन अहिर, सुनील शिंदे, शिवाजी आढळराव पाटील आणि वरुण सरदेसाई यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अचानकपणे मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून त्यांना शिवसेनेकडून हमखास संधी दिली जाणार असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :अभिनेत्री मालवी मल्होत्रावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, एकतर्फी प्रेमातून केला होता हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details