मुंबई -ज्येष्ठ अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसमध्ये केवळ लोकसभा निवडणुकीपुरत्या आल्या होत्या. निवडणूक संपल्यानंतर त्या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात सक्रिय झाल्या नाहीत आणि त्यांनी तेव्हाच काँग्रेस सोडली. यामुळे आता त्या कोणत्या पक्षात जात आहेत, याबद्दल आम्हाला काहीही देणेघेणे नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आम्ही लोकसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये कोणतेही योगदान दिले नाही. शिवाय त्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे आता त्या इतर पक्षात जात असतील, तर त्यावर आम्हाला काहीही वाटत वाटणार नाही. उलट त्यांना आमच्या पक्षात मोकळेपणाने काम करण्याची संधी आम्ही दिली होती. ही संधी त्यांनी गमावली असल्याचे एकनाथ गायकवाड म्हटले. काँग्रेस हा असा पक्ष आहे, ज्या पक्षात लोकशाही रुजलेली आहे. त्यामुळे या पक्षात सर्वांनाच मोकळेपणाने काम करण्याची संधी मिळते, असेही गायकवाड यांनी सांगितले.