मुंबई:राज्यातील बारावीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या जात नाहीत आणि त्या पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणारे असतात. त्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या गेल्या नाहीत तर निकालाला विलंब होईल. म्हणून शासनाने याबाबत तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती आमदार एड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवेशाचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांनी दखल घेत हा विषय गंभीर असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे निर्देश दिले.
तातडीने तोडगा काढू:सभागृहात शिक्षणमंत्री उपस्थितीत नव्हते. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेतली. या विषयावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, शासन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, या संदर्भात आज दुपारी शिक्षक संघटनांच्या नेत्यांची चर्चा करून आजच हा विषय निकालात काढून असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
कॉपी प्रकरणांना आळा:10 वी व 12 वी शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारपासून सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर ठेवली होती. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली होती. मुंबई विभागीय पातळीवर चार जिल्हे मिळून तीन लाख 40 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेले आहे. यंदा कॉपीला आळा बसवण्यासाठी हायटेक कॉपी करणाऱ्यांना सुद्धा ब्रेक लावण्याचे काम परीक्षा मंडळांनी मनावर घेतलेले आहे. त्यामुळे यंदा अशा प्रकाराला आळा असेल, अशी शक्यता परीक्षा मंडळाने वर्तवली आहे.