मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उर्फी जावेदविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच उर्फी समोर आली तर तिचे थोबाड रंगवणार, असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले होते. यानंतर आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच नुकतीच उर्फीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी वाघ यांच्या विरोधात महिला आयोग आणि मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
उर्फीवर कारवाईची मागणी :अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत उर्फीवर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. चित्रा वाघ यांनी म्हटले की, ज्या दिवशी उर्फी माझ्या हाताला सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा तिचे थोबाड रंगवेन आणि नंतर मी ट्विट करून सांगेन की, मी काय केलंय ते. आजही सांगते, उर्फी जावेद समोर आली तर तिला आधी साडीचोळी देऊ; मात्र त्यानंतरही तिने तिचा नंगानाचा सुरूच ठेवला तर तिचे थेट थोबाड फोडणार आहे. उर्फीला कपड्यांची एलर्जी असेल तर आपण सगळ्या प्रकारच्या गोळ्या देण्यास सक्षम आहोत, असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले होते. यानंतर आता उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.