मुंबई - येथील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 35% च्या मतदान झाले आहे. या मतदारसंघात असलेल्या नवजीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर राज्याचे लक्ष लागले होते.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ याच मतदान केंद्रावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी मतदान केले. तर, दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही याच मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेतच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा - मतदानाची सुट्टी जाहीर; मात्र, सफाई कर्मचारी 'ऑन ड्यूटी', मतदान करणे बनलेय अवघड
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ यावेळी येथे झालेल्या शिवसेनेच्या बंडखोरीमुळे मोठा चर्चेत राहिला. शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत या मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उभ्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने उभे केलेले उमेदवार व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना त्यांनी मोठे आव्हान दिले आहे. तर, दुसरीकडे आज या मतदारसंघात एकूणच संमिश्र चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. येथे असलेल्या मुस्लीम बहुल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने मतदारांचा कल असल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर, जुन्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या आदेशाला पहिल्यांदाच डावलून उघडपणे अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत यांच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतल्याचे या ठिकाणी दिसून आले.
हेही वाचा -राज्यभरात 'या' ठिकाणी झालेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड