मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मंगळवार २८ मे रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांना नुकसान झाल्याची सार्वत्रिक चर्चा झाली. जी चूक लोकसभेत झाली ती पुन्हा विधानसभेत होणार नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडीसह मनसेलाही सोबत घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याने सांगण्यात आले.
महाआघाडीच्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह शेकाप, पीआरपी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित हेाते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, या बैठकीत प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावरही चर्चा झाली. महाआघाडीच्या पहिल्या बैठकीत आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, यासंदर्भात आणखी बैठकी होतील. विखे-पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपमध्ये जातील असे वाटत नाही, ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालाच्या अनुषंगाने इव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका आहे. महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत आज चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.