मुंबई - उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी गेल्या होत्या. उत्तरप्रदेश पोलीस प्रशासनाने त्यांना थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. यातील एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने गांधी यांचा अक्षरशः कुर्ता पकडून ओढले. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी खेद व्यक्त केला. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.
बंदोबस्तादरम्यान महिला पोलीस या ठिकाणी असणे आवश्यक होते. परंतु, असे झाले नाही असा प्रश्न देखील यावेळी गोऱ्हे यांनी सदरील पत्रातून विचारला आहे. तसेच या कुटुंबाला उत्तर प्रदेश पोलिसांचे सहकार्य लाभत नाही. परिणामी हे सर्व प्रकरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करणारे असल्याने या कुटुंबाला केंद्रीय पोलिसांचे संरक्षण देण्यासाठी देखील विचार व्हावा, असे देखील या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा -शेतकऱ्यांचा पुळका असणाऱ्यांनी साखर कारखाने का विकले?; चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना प्रश्न