मुंबई- रेल्वे परिसरात गंज लागून पडित असलेल्या रेल्वे रुळांची विलेवाट लावण्याचे आदेश मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता वापरात नसलेले रेल्वे रूळ भंगारात देण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.
वापरात नसलेले रेल्वे रुळ आता निघणार भंगारात
मध्य रेल्वे मार्गावरील परिसरात अनेक ठिकाणी वापरात नसलेले पडित रेल्वे रूळामुळे परिसरात अस्वच्छता दिसून येते. तर, मान्सून काळात पाण्याचा निचरा होण्यासाठी, झुडप्यांची छाटणी करण्यासाठी मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होतात.
रेल्वेचे महाव्यवस्थापकांचे आदेश
मध्य रेल्वे परिसरात, घाट भागात नुकताच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दौरा केला. या दौऱ्यात त्यांना रेल्वे परिसरात, विविध सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात विनावापर रेल्वे रूळ पडित अवस्थेत दिसून आले. त्यामुळे कंसल यांनी विभागांतील विविध सेक्शनमध्ये विनावापर रेल्वे रुळाचा कुठलाही तुकडा पडलेला असू नये, अशी सूचना केली. यासह हे रूळ उचलण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन रेल्वे रूळ मार्ग तयार करणे, मेगाब्लाॅकवेळी रेल्वे रूळाचा वापर केला जातो. यावेळी जुने रूळ त्याच भागात ठेवून दिले जातात. असे प्रकार अनेकवेळा झाल्याने पडलेल्या रूळांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे पडित असलेले रेल्वे रूळ जवळील डेपोत जमा करून भंगारात काढणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.
रेल्वे रूळ हटविण्याच्या सूचना
मध्य रेल्वे मार्गावरील परिसरात अनेक ठिकाणी वापरात नसलेले पडित रेल्वे रूळामुळे परिसरात अस्वच्छता दिसून येते. तर, मान्सून काळात पाण्याचा निचरा होण्यासाठी, झुडप्यांची छाटणी करण्यासाठी मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होतात. तसेच रेल्वे रूळाबाजूला असलेले पडीत रेल्वे रूळ चोरी होण्याच्याही घटना घडत आहे. त्यामुळे महाव्यवस्थापकांनी विना वापरात असलेले रेल्वे रूळ हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे वापरात नसलेले रेल्वे रूळ प्रत्येक डेपोत जमा करून भंगारात देण्याचे नियोजन करत आहे. मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभाग, कार्यशाळा, शेड इत्यादी परिसर भंगार सामग्रीपासून मुक्त व्हावे यासाठी ' झिरो स्क्रॅप मिशन' अभियान सुरू केले आहे. या अभियानातंर्गत पडीत असलेले रेल्वे रुळांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.