मुंबई- राज्यातील काही भागात बुधवारी वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जोरदार पावसामुळे काही जिल्ह्यातील पिकांना नुकसान झाले असून फळबागांना देखील फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचे छप्परही उडाल्याची घटना घडली आहे.
राज्यातील काही भागात अवाकाळी पावसाचा कहर अमरावती शहरात विजांच्या कडकडटासह मुसळधार पाऊस
शहरात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण शहर अंधारात बुडाले. कोरोनाची धास्ती आणि संचारबंदीत पावसाने हजेरी लावल्याने अमरावतीकर हैराण झाले होते.
अकोल्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस
शहरात काल विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. हे वातावरण जिल्हाभर होते. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात थंडावा निर्माण झाला होता. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला. कडक ऊन असताना वातावरणातील हा बदल आरोग्य खराब करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
पुण्यातील खेतेपठार येथे अवकाळी पावसामुळे घरांचे छत उडाले
आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार (गंगापूर खुर्द) येथे आज सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत वाहिन्यांच्या तारा तुटून पडल्या, तर घरांची छत उडाल्याची घटना घडली. सध्या कोरोनाच्या सावटामुळे आदिवासी भागातील नागरिकांचे रोजंदारीची कामे बंद झाली आहे. त्यातच पावसामुळे घराचे छत उडाल्याने खेतेपठार या आदिवासी भागातील नागरिकांच्या चिंत्तेत भर पडली आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
साताऱ्यातील कराड, पाटण तालुक्यात वादळी पाऊस, फळबागांचे नुकसान
कराडसह पाटण तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. वादळी वाऱ्यामुळे कोयना नगर परिसरात आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या. परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी आणलेला चारा तसेच चुलीसाठी आणलेले जळणही भिजले. चारा आणि जळण झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.
कराड शहर आणि तालुक्यात सगळीकडे वादळी पाऊस झाला. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे, उष्म्याने हैराण झालेल्या कराडकरांना दिलासा मिळाला.
हिंगोलीत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
काल रात्री १० वाजता जिल्ह्यातील विविध भागात विजेचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यासह भाजीपाला वर्गीय पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले. आधीच कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतातील भाजीपाला कुठेही विक्रीसाठी घेऊन जाता येत नसल्याने गुरांना भाजीपाला खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. आता पावसामुळे रबीची पिकेही हातातून जाण्याची शक्यता आहे.
पुण्याताली इनामगाव व गणेगाव दुमला येथे नारळाच्या झाडावर विज कोसळली
काल सायंकाळच्या सुमारास शिरूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील इनामगाव व गणेगाव दुमला येथे नारळाच्या झाडावर विज पडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नाराळाचे झाड जळून खाक झाले. पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली होती.
बुलडाण्यात पुन्हा अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचे नुकसान
काल सायंकाळच्या सुमारास शहरात अवकाळी पाऊस झाला. तसेच खामगाव शहरात पावसासह गारपीटही झाली. यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तापमानात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.