मुंबई Heavy Rain In Mumbai :रविवारी सायंकाळी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. मुंबईसह पालघरमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली. पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. 26 नोव्हेंबर तसंच 27 नोव्हेंबरला मुंबईत 'यलो अर्लट'चा इशारा देण्यात आलाय. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.
अवकाळी पावसाचा अंदाज : राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही काही ठिकाणी पावसाचं आगमन झालंय. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. त्यामुळं नागरिकांना हिवाळ्यात पावसाचा अनुभव मिळत आहे. तसंच हवामानातील बदलामुळं आजारांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतंय. 25 ते 28 नोव्हेंबर या तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईतील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली होती. मुंबईतील पावसामुळं हवेतील प्रदूषण कमी होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. मुंबईतील वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे.