मुंबई :भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस, काही जिल्ह्यात अवकाळीच्या हलक्या सरी तर काही जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या कोकण विभागात अवकाळी पावसाच्या मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिक या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.
शेतकरी संकटात, हवामान विभागाचे आवाहन :राज्यातील शेतकरी शेतीमालाला हमीभाव नसल्याने संकटात सापडला आहे. मात्र, आता गारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. एका बाजूला शेतात वर्षभर राबुन उभे केलेले पीक काढणीला आलेले असतानाच, आता पुढील आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील आणखी दोन दिवस आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने केले आहे.