मुंबई - राज्यातील विदर्भ वगळता पहिले ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. दहावीच्या निकालाची शिक्षकांना घाई असतांना मुंबईत मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयाने पहिल्याच दिवशी अनावश्यक कामांना शिक्षकांना जुंपले आहे. त्यामुळे शिक्षकांची खूपच दमछाक झाली असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन ?
जून व जुलै महिन्याचे ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रकाचे नियोजन करून शिक्षण विभागाला आजच देण्याच्या सूचना देण्यात आल्या एकेका शिक्षकाकडे पाचवी ते सहावी वर्ग असतात. त्यामुळे दहावीचे काम करावे की वेळापत्रक नियोजन करावे असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. वास्तविक पाहता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची आकलन व ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अध्यापन तंत्राचा वापर करून शिकवावे लागते. या शासन निर्णयावरून तत्कालीन शिक्षण सचिवांनी पाठ टाचण बंद केले होते. तरीसुद्धा मुंबईत पाठाचे नियोजन करण्याची शिक्षकांना सक्ती केली जात होती. याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी आवाज उठवून शिक्षण उपसंचालकांकडे लेसन प्लॅन बंद करण्याची मागणी केली होती. शिक्षण उपसंचालकांनी अनिल बोरनारे यांच्या पत्राच्या आधारे मुंबईतील शिक्षण उत्तर, पश्चिम व दक्षिण तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देऊन शिक्षकांना लेसन प्लॅनची सक्ती करू नये असे आदेश काढले होते. त्यामुळे शिक्षण निरीक्षक यांनी मंगळवारी दिलेले आदेश म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया अनिल बोरनारे यांनी दिली.