मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कोणीतरी फोनद्वारे ही धमकी दिली. या धमकीची माहिती गडकरींच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून लवकरच आरोपी सापडतील.
पाच महिन्यांत तिसऱ्यांदा धमकी : नितीन गडकरींना गेल्या पाच महिन्यांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यापूर्वी 14 जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या महाराष्ट्रातील नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करून धमक्या देण्यात आली होत्या. फोन करणाऱ्याने दीड तासात तीन वेळा फोन करून धमक्या देण्याबरोबरच १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. नागपूर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगावी येथील तुरुंगात धमकी देणाऱ्या कॉलरचा नंबर शोधून काढला होता. जयेश पुजारी उर्फ जयेश कंठा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मार्चमध्ये पुन्हा जयेशच्या नावाने धमकी देण्यात आली होती. यानंतर 21 मार्च रोजी गडकरींना पुन्हा फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर कार्यालयातच पुन्हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतरही धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जयेश पुजारा असल्याचे सांगितले होते. गेल्या वेळी जे घडले नाही ते यावेळेस होईल, असे तो धमकी देणारा म्हणाला होता.
कोण आहे जयेश पुजारा : नागपूर पोलिसांच्या तपासानुसार, जयेश पुजारा उर्फ जयेश कंठा हा कर्नाटक पोलिसांचा हिस्ट्री शीटर आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला फाशीची शिक्षा झाली आहे. सध्या तो कर्नाटकातील बेळगावी भागातील हिंडलगा कारागृहात आहे, जेथे उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असताना त्याची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. हिंडलगा कारागृहातूनच पहिल्यांदा नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात फोन करण्यात आला होता.