मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकहाती बहुमत मिळविण्यासाठी भाजप पूर्णपणे तयारीला लागला आहे. यासाठी देशभरात भाजप राज्यसभेतील खासदारांना सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये राज्यसभेतील अनेक नामवंत खासदारांचा समावेश आहे. त्यातच महाराष्ट्रातूनही अनेक जणांचा समावेश असून त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही समावेश आहे. भाजपकडून नारायण राणे यांना मुंबईतून किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नारायण राणे यांचे नाव आघाडीवर :लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने कंबर कसली असून त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सुद्धा लोकसभेच्या 48 जागांपैकी मिशन 45 जागेसाठी भाजप जोरकस तयारीला लागली आहे. राज्यसभेत भाजपचे ९२ खासदार आहेत. त्यापैकी किमान 25 ते 30 खासदारांनी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. अशात राज्यातील 18 केंद्रीय मंत्र्यांपैकी किमान 10 जणांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार आहे. भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून जी नावे पुढे येत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव आघाडीवर आहे. या विषयावर बोलताना भाजपचे मंत्री, रवींद्र चव्हाण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमताने निवडून यायचे आहे. त्याचबरोबर भाजपच्या खासदारांची संख्या ही 405 च्या वर न्यायची असल्याने भाजप पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. परंतु लोकसभेसाठी उमेदवारी बाबतचा अखेरचा निर्णय हा पार्लरीमेंटरी बोर्डाचा असणार असल्याचेही चव्हाण म्हणाले आहेत.
नारायण राणे यांच्यासाठी मुंबई की रत्नागिरी - सिंधुदुर्ग ? :केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज्यसभेत भाजपचे खासदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना त्यांनी मुख्यमंत्री पद तर काँग्रेसमध्ये असताना त्यांनी राज्याचे महसूलमंत्री पद भूषविले आहे. नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान हा पक्ष भाजपामध्ये विलीन करुन भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु नंतर राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आली. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सतत आक्रमक भूमिका घेतली असून ती भाजपला फायदेशीर ठरु शकते. भाजप नारायण राणे यांच्यासाठी मुंबईतील लोकसभेचा मतदारसंघ शोधण्याच्या तयारीत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते, तशा पद्धतीची चाचपणी सुरू आहे.