मुंबई:केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले आहे. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री ठाकूर म्हणाले, की मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा झपाट्याने विकास झाला आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे की, या वर्षीही भारताचा विकास दर जगात सर्वाधिक असणार आहे. जगाला भारत आणि मोदींच्या नेतृत्वावर आशा आहे.
समितीने निष्पक्ष तपास केला-पोलिसांचा तपास सुरू असताना कुस्तीपटूंनी खेळाचे आणि खेळाडूंचे नुकसान होईल असे काहीही करू नये, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले. मोदी सरकारच्या काळात खेळांसाठी तरतूद वाढविण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी खेलो इंडिया, टॉप्स योजना यांसारख्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. सरकारकडून खेळाडूंच्या प्रशिक्षणावर खूप पैसा खर्च केला जात आहे. खेळासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. खेळाडूंशी चर्चा करून आम्ही एक समिती स्थापन केली. समितीने निष्पक्ष तपास करून मंत्रालयाला अहवाल दिला. त्याबाबत दिल्ली पोलिसांनी एफआयआरही दाखल केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.