मुंबई :अमित शाह मुंबई दौऱ्यावर आलेले असताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील हे या दौऱ्यापासून दूरच राहिले. अमित शाह यांचे शनिवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी सह्याद्री या अतिगृहात बैठकांचे सत्र घेतले. या बैठकीलासुद्धा चंद्रकांत पाटील फिरकले नाहीत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात असताना या दौऱ्यापासून चंद्रकांत पाटील लांब राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय :वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यावरून केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले होते. अशातच आता चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली आहे. पक्ष नेतृत्वापासून त्यांना दूर सारले तर जात नाही ना? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री यांनी अमित शहा यांचा उल्लेख करत जेव्हा जेव्हा अमित भाईंना भेटतो, तेव्हा काम करण्याची प्रेरणा, जिद्द, ताकद त्यांच्याकडून भेटते, असे सांगितले. अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांची अनुपस्थिती ही या दौऱ्या दरम्यान प्रकर्षाने जाणवली.