मुंबई -केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असा आरोप 'शेतकरी आत्महत्या करणार नाही अभियाना'चे प्रमुख माणिक कदम यांनी केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी पॅकेज बाबत शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या संघटना आणि विरोधी पक्ष मुग गिळून गप्प असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी आणि शेतमजुर कामगार यांना पॅकेजमध्ये काही नाही. मात्र, कोण बोलणार? आम्ही बोललो तर प्रसार माध्यमे म्हणतात, किती मोठे पॅकेज आहे. शेतकऱ्यांना नसेल द्यायचे तर देऊ नका. मात्र, असले तोंडाला पाने पुसणारे, निराधार आकडेवारी, दिशाभूल करणारे पॅकेज जाहीर करू नका. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा जशी होती तसेच हे पॅकेज आहे. सर्वात कहर म्हणजे आधी तीन कोटी शेतकऱ्यांना दिलेल्या (कोणाला दिले हे माहीत नाही) चार लाख कोटी रुपयांचे कर्ज या पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे. मग पंतप्रधान मोदींना याबाबत परवा सांगता येत नव्हते का? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.