मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारी यास आफ्रिका खंडातील सेनेगल देशातून भारतात रविवारी रात्री उशिरा बंगळुरू विमानतळावर आणण्यात आले आहे. भारतात त्याचावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी धमकावणे, बेकायदेशीर कृत्य करणे, संघटित गुन्हेगारी करणे यांसारखे २५० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. सेनेगलमध्ये रवी पुजारी हा अँथनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी दस्तावेजात या नावाची नोंद आढळून आली आहे. खंडणीच्या पैशातून त्याने 'नमस्ते इंडिया' नावाच्या हॉटेल्सची श्रृंखला देखील सुरू केली आहे.
बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट रवी पुजारीकडून जप्त करण्यात आला आहे. तो मलेशिया, मोरोक्को आणि थायलंड, पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, रिपब्लिक ऑफ कांगो, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशात सतत ठिकाण बदलून राहत होता. त्याने गेल्या अनेक वर्षात खंडणी उकळून मिळालेल्या पैशांतून 'नमस्ते इंडिया' या नावाने रेस्टोरंटची श्रृंखला सुरू केली आहे. तर, सेनेगलची राजधानी डकारमधील श्रीमंतांपैकी एक अशी त्याची ओळख झाली होती.
पुजारीवर सतत भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर होतीच यामुळे वेळ मिळताच सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. याआधी पुजारीला गेल्या वर्षी जानेवारीत अटक करण्यात आली होती. सेनेगलच्या डकारमधील एका आलीशान केस कर्तनालयातून पुजारीला अटक करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळवून तो फरार झाला होता. पण आता पुन्हा सेनेगलमधूनच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यावेळेस पुजारी पुन्हा जामीनचा फायदा घेत फरार होऊ नये याकरता भारतीय यंत्रणांनी प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुर्ण करून त्यास भारतात आणले आहे.