महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करोडोंच्या संपत्तीचा मालक दाऊद, मात्र आई-वडिलांच्या अंत्ययात्रेला नाही हजर राहू शकला - Underworld don Dawood Ibrahim

Dawood Ibrahim Family : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम मुळचा मुंबईचा. त्यानं देश सोडल्यानंतरही त्याचं कुटुंब मुंबईतच राहायचं. मात्र जेव्हा त्याच्या आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला, तेव्हा तो त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील हजर राहू शकला नाही. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.

Dawood Ibrahim Family
Dawood Ibrahim Family

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:35 PM IST

मुंबई Dawood Ibrahim Family :अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला असून तो पाकिस्तानातील कराचीमध्ये उपचार घेत असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. पाकिस्तानातील काही वृत्त वाहिन्यांनी ही बातमी दिली. मात्र या बातमीला पाकिस्तान सरकारकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.

१९९३ च्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड असलेला दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहे. दाऊदचा मुंबईतील नागपाडा ते पाकिस्तानातील कराची हा प्रवास १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सुरू झाला. तो कराचीमध्ये स्थायिक झाल्याच्या बातम्या सातत्यानं येत असतात. तेथे त्याला पाकिस्तान सरकारकडून संरक्षण दिलं जात असल्याचंही बोललं जातं.

दाऊदची कौंटुंबिक पार्श्वभूमी : दाऊद इब्राहिम मुळचा मुंबईचा. त्यानं देश सोडल्यानंतरही त्याची बहीण आणि आई-वडील मुंबईतच राहायचे. मात्र जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा दाऊद त्यांच्या अंत्यसंस्कारालाही हजर राहू शकला नव्हता! ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी दाऊदच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती दिली आहे. दाऊदचे वडील मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये हवालदार होते. दाऊद प्रथम वरळी येथील पोलीस वसाहतीमध्ये वाढला. त्यानंतर तो नागपाडा येथील अहमद सेलर या उर्दू शाळेत आठवीपर्यंत शिकला. दाऊद डमी विद्यार्थी बसवून १०वी पास झाला, असंही सांगितलं जातं. ५ फूट ६ इंच उंची असलेला दाऊद उर्दू, मराठी आणि हिंदीसह इंग्रजी भाषा बोलतो, अशी माहितीही पवार यांनी दिली.

दाऊदची पहिली टोळी : वडील पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर दाऊद आणि त्याचा भाऊ पाकमोडिया स्ट्रीट येथे राहावयास गेले. तेथे हाजी मुसाफिर खाना या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर त्यांनी एक खोली विकत घेतली. त्यानंतर त्यांनी हळूहळू त्याच इमारतीमधील इतर रहिवाशांच्या खोल्या ताब्यात घेणं सुरू केलं. दाऊद आणि त्याची टोळी सुरुवातीला याच इमारतीमधून आपली सूत्रं हलवीत असत.

दाऊद सध्या कुठे राहतो : १९८१ मध्ये दाऊदचा मोठा भाऊ शब्बीर मारला गेला. दाऊदच्या वडिलांचा मृत्यू १९८८ मध्ये झाला. तर आई २००० मध्ये मरण पावली. मात्र दाऊद या दोघांच्याही अंत्यविधीला हजर राहू शकला नाही. असं म्हणतात की, तो आपली पत्नी मेहजबिनसह कराचीतील डिफेन्स कॉलनीतच होता. मात्र त्याचा खरा पत्ता आयएसआय शिवाय कोणालाही माहीत नाही. दाऊदचा मोठा भाऊ शब्बीरच्या मृत्यूनंतर २००९ मध्ये कराचीत त्याचा छोटा भाऊ नुराचंही निधन झालं. तो केवळ ५२ वर्षांचा होता. त्याचं दीर्घ आजारानं निधन झालं.

बहिणीच्याही अंत्ययात्रेला मुंबईत येऊ शकला नाही : दाऊदच्या आशीर्वादामुळे त्याची बहिण हसिनानं नागपाडा भागात आपली प्रचंड दहशत निर्माण केली होती. तेथे हसिनाचा दरबार भरत असे. तिच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. २०१४ मध्ये हसिना पारकरचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर दाऊद अंत्ययात्रेला मुंबईत येऊ शकला नव्हता, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी दिली आहे. त्याच्या अनेक बेनामी मालमत्ता असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या काही मालमत्तांचा लिलावही करण्यात आला आहे.

हे वाचलंत का :

  1. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे राज्यातील अनेक नेत्यांशी कथित संबंध? राजकीय आरोपांनी प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details