मुंबई - सरकार बदलले तरी शासकीय यंत्रणा तीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाहीत. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत नसल्याने त्यांना इशारा देण्यासाठी 17 जुलैला मुंबईत शिवसेना 'इशारा मोर्चा' काढणार आहे. या मोर्चात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेनेचे इतर नेते सामील होणार असल्याची माहिती ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
पीक विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी शिवसेनेचा बुधवारी मुंबईत मोर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसेना ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक ठिकाणी केंद्र उभी करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माहिती गोळा करुन शेतकऱ्यांना ज्या पीक विमा कंपन्या लाभ देत नाहीत. त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याने त्या पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईत हा मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर जर विमा कंपन्यांना कळत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत उत्तर देऊ, असाही इशारा यावेळी ठाकरे यांनी दिला. हा मोर्चा शेतकऱ्याचा नसेल तर शेतकऱ्यांसाठी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही केंद्रात आणि राज्यातही सत्तेत आहोत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या शेतकरी कर्जमाफी आणि प्रधान मंत्री फसल विमा या दोन्ही योजना चांगल्या आहेत. पण यंत्रणा तीच असल्यामुळे या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या कंपन्यांना इशारा देण्यासाठी १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. तसचे यात मी स्वत: सहभागी होणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेकडून राबविण्यात येणारी जन आशीर्वाद यात्रा ही वेगळी आहे. ती समाजाच्या सर्व घटकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही काढत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे. पी साईनाथ यांनी काही सूचना नुकत्याच दिल्या आहेत. त्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. मात्र यादरम्यान पीक विमा योजनेत काही त्रुटी आहेत किंवा उणीव आहेत त्या आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी पंढरपूरला जाणार नाही, हे कोणी पसरवले हे माहीत नाही. मी माझा कार्यक्रम जाताना जाहीर करेन असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारकडे कृषी आयोग स्वतंत्र असावा अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.