मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात ईडीकडून गुन्हा नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. त्याच्या प्रतिक्रियाही राज्यभरात उमटल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर मुंबईतल्या ईडी कार्यालयावर धडक दिली. पवारांवरील कारवाई ही सुडाने केल्याचे राष्ट्रवादीचे सर्वच नेते म्हणत होते. तर भाजप नेते मात्र केलेल्या कारवाईचे जोरदार समर्थन करत होते. अशा वेळी पवारांच्या मदतीला शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे धावून आले.
पवारांच्या समर्थनार्थ मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा एकही बडा नेता समोर आलेला दिसला नाही. पण राजकीय विरोधक असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र पवारांच्या बाजून उभे राहिल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे. नवी मुंबई येथ आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्याला ते उपस्थित होते. त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. ही संधी साधत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सुडाने वागलेले, कोणीच कोणाचं माफ करत नाही, त्यामुळे आम्ही कोणा बरोबरच सुडाने वागत नाही. असे सुचक वक्तव्य उद्धव यांनी केले. यातून त्यांना तुम्हीही सुडाने वागू नका असे मुख्यमंत्र्यांना सुचवायचे होते का अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. विशेष म्हणजे यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे आमदार आणि पवारांचे समर्थक शशिकांत शिंदेही उपस्थित होते. उद्धव यांच्या वक्तव्यावर त्यांनीही दाद दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावर मिश्कील हस्य केले.