उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गट मुंबई Uddhav Thackrey on Ram Mandir : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी राम मंदिर, कल्याण लोकसभा मतदार संघ आढावा तसंच आमदार अपात्रतेवर त्यांनी भाष्य केलं. येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होतंय, याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पण याच दिवशी आपण नाशिकमध्ये काळाराम मंदिरातील महाआरतीसाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना आमंत्रित करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.
अपात्रतेच्या निकालावर 16 तारखेला बोलणार : अपात्रतेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "निकाल हा एकतर्फी लागलाय. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. परंतु, त्यावर मी 16 जानेवारीला पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात मी सविस्तर बोलेन."
आज कल्याणमध्ये जातोय :आज उद्धव ठाकरे कल्याणला जाणार आहेत, यावर बोलताना ते म्हणाले, "मी या आधीच ठरवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं. कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आणि तेथील शाखेमध्ये भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळं त्या मतदार संघातील आढावा घेण्यासाठी मी आज तिकडं जात आहे. त्या मतदार संघातील समस्या, प्रश्न जाणून घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे."
राष्ट्रपतींना आमंत्रण : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे. यावेळी राष्ट्रपतींना अयोध्येत आमंत्रित करावं. आम्ही सुद्धा नाशिकला काळाराम मंदिर इथं दर्शन करणार आहोत. कार्यक्रम करतो आहोत, त्याला सुद्धा राष्ट्रपती यांना आम्ही रितसर निमंत्रण देत आहोत. आमचे खासदार याचं रितसर निमंत्रण देतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.
बैठकीला अनुपस्थित राहणार, त्यातून वेगळा अर्थ काढू नका : 'इंडिया' आघाडीच्या आजच्या बैठकीवर बोलताना ठाकरे म्हणाले की, "आज 'इंडिया' आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीला मी अनुपस्थित राहणार आहे. मी कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी तिकडं जात आहे. परंतु, त्यातून तुम्ही कोणताही वेगळा राजकीय अर्थ काढू नका."
कारसेवक नसते तर . . : सध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडं देशभराचं लक्ष लागलंय. 22 जानेवारीला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत आहे. राम मंदिर उभं राहण्यासाठी कारसेवकांचं मोठं योगदान आहे. 'पहिले मंदिर बनायेंगे' पहिल्यांदा ही भूमीका शिवसेनेनं घेतली होती. कारसेवक नसते तर कदाचित राम मंदिर उभं राहिलं नसतं. आज जे पुढं पुढं झेंडा लावतात किंवा पुढं पुढं करतात ते दिसले नसते, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावलाय.
हेही वाचा :
- राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी करणार 11 दिवसांचा खास उपवास; ऑडिओ शेअर करत देशवासियांना दिला 'हा' संदेश
- अयोध्येचे निमंत्रण; काँग्रेसची, धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी अवस्था