मुंबई-चैत्यभूमी येथील इंदू मिलच्या जागेवर उभे राहणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर बदल करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भीम अनुयायांचे आंदोलन आणि मोठ्या संघर्षातून हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन झाले होते.
महा विकास आघाडी सरकारने आराखड्यात बदल करत इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 450 फुटांपर्यंत वाढवली आहे. या भव्य स्मारकासाठी 1 हजार 89 कोटी 95 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास राज्य सरकारने मागील महिन्यात मंजुरी दिली होती.
इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा चबुतरा 100 फूट आणि पुतळा 350 फूट अशी स्मारकाची उंची 450 फूट ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकासाठी पूर्वी 763 कोटी 5 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली होती. पण स्मारकाची उंची वाढवण्यात आल्यामुळे स्मारकाचे डिझाईनही बदलणार असल्याने खर्चात वाढ होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्मारका संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेनुसार प्रकल्पासाठी 1 हजार 89 कोटी 95 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणन नियक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा-मुंबईच्या महापौरांची चौकशी करा, किरीट सोमैयांची पालिका आयुक्तांकडे मागणी