मुंबई : महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की, त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही आणि म्हणूनच त्यांना कंटाळून त्यांचे ४० आमदार गेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रावर मारलेला शेरा दाखवा व एक हजार रुपये मिळवा असा, उपरोधिक टोलासुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी लगावला आहे.
हजारो लोक आज भाजपमध्ये येण्यास तयार : यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे निष्क्रिय होते, याचा पाढाच वाचून दाखवला. तर, देवेंद्र फडणवीस यांचे कोतूक केले आहे. फडणवीस हे असे नेतृत्व आहे की, प्रत्येक पत्रावर आदेश लिहून प्रशासनाला निर्देश देत राहतात. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व आपल्याकडे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो लोक आज भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. आपली वाट पाहत आहेत, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
खिशात पेन नाही तो मुख्यमंत्री कसा? : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार, जनता एकाच कारणाने कंटाळून गेली, की मुख्यमंत्र्याच्या खिशात पेन नाही. उद्धव ठाकरे यांच्या खिशात पेन दाखवा. ज्या मुख्यमंत्र्याच्या खिशात पेन नाही तो मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? असा प्रश्नही बावनकुळे यांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना ठाकरे परिवाराने भाजप सोबत गद्दारी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या किंचित सेनेचे पदाधिकारी तर त्यांना एवढे कंटाळले आहेत की ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे कामाला लागा. असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.