भाजप आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया मुंबई :शिवसेना उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या विदर्भ दौऱ्यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना आत्ताच विदर्भाचा पुळका का आला? असा प्रश्न विचारला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अगोदर त्यांचा धर्म सांगावा? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
विदर्भाची आठवण आत्ताच का झाली? :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटर वरून निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणतात की; सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. तेच उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही. आता मात्र उद्धव ठाकरे यांना विदर्भाचा किती पुळका आलेला दिसतो. सत्तेवर असताना मंदिरे बंद ठेऊन मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरात दर्शनासाठी जावे लागते, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंचे ढोंगी राजकारण :उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कितीही दौरे केले तरी, त्यांचे ढोंगी राजकारण जनता ओळखून आहे. सत्ता गेल्यामुळे त्यांची राजकीय नौटंकी सुरु असल्याचा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आता तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात. आता तुम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व का सोडले. तसेच आमच्यासोबत गद्दारी करून तुम्हाला काय मिळाले हेही एकदा जनतेला तुम्ही सांगून टाका? असा टोलाही ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांचा धर्म कुठला? :उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या स्वागतार्थ "धर्माभिमानी" असे बॅनर विदर्भात उबाठा गटाकडून लावण्यात आले आहेत. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्म कधीच सोडला आहे. ते हिंदू धर्माचा द्वेष करायला लागले आहेत. त्यांचा नेमका धर्म कुठला? हे अजून गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरे यांचे राजकीय धर्मांतर झाले असून त्यांनी अगोदर आपला धर्म सांगावा? त्यांच्या शरीरात असलेले रक्त हे भगवे आहे की, ते आता हिरवे झाले आहे, हे त्यांनी अगोदर सांगावे. ते खरोखरच धर्माभिमानी आहेत, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत, तर मुस्लिम लॉ बोर्डाचे सदस्य इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याला न भेटता फक्त उद्धव ठाकरे यांना भेटायला कसे जातात?. समान नागरी कायद्याबद्दल जशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती तशी, ठोस भूमिका उद्धव ठाकरे का घेत नाहीत? उद्धव ठाकरेंनी अगोदर आपला धर्म सांगावा असे नितेश राणे म्हणाले आहेत.
हेही वाचा -Uddhav Thackeray Vidarbha visit: पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाही-उद्धव ठाकरे